Last Updated on 31 May 2020 9:50 AM by
गोष्टीचे नाव आहे ‘हिरकणी’
आम्ही आमच्या शाळेची सहल घेऊन रायगडावर गेलो होतो तर तिथे आम्हाला हिरकणी दिसली होती. ती मिना बाजाराच्या ज्या पडक्या भिंती होत्या त्यातून ती वर आली होती. तिच्या अंगावर एक साधं लुगडं होतं. डोक्यावर एक पाटी होती. त्या पाटीत दुधाची भांडी होती. ती दूध विकायला रायगडावर आली होती. ती एक कोकणी बाई होती. तिने कासोटा घातला होता. मिनाबाजाराच्या पलीकडे एक कडा होता. अर्थात खोल दऱ्याही असतील. ती पलिकडुन डोंगर चढून वर आली होती. आता तो मिना बाजार पडला होता. पण ती हिरकणी अजूनही होती . चारशेवर्षापूर्वी होती तशीच! इतक्या वर्षानंतर अजूनही डोंगर तळीच्या खेड्यातून अशा हिरकण्या पूर्वी सारख्याच जशाच्या तशा आहेत. अजूनही त्या रायगडावर दूध विकायला येतात हे आम्हाला तिथं सहलीला गेल्यानंतर कळलं.
आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आम्हाला त्या सहलीतच कळली. आमची सहल रायगडावर बरोबर सूर्योदयालाच पोहोचली होती. तसं म्हटलं तर रायगड हे आमच्या सहलीतील ठरलेलं ठिकाण नव्हतं. कोयना धरण,चिपळून, परशुराम, प्रतापगड आदी ठिकाणं ठरली होती. त्या दिवशी आमचा मुक्काम पोलादपूरच्या एका हायस्कूल मध्ये होता. आम्ही तिथं संध्याकाळी सहाला पोहोचलो होतो. तिथले दोन शिक्षक आमचीच वाट पाहत होते. गेल्या गेल्या ते म्हणाले,” अगोदर तुम्ही पाणी भरून ठेवा. या कळशा तो तिथं आड आहे. अंधाराचं कुणालाही बाहेर सोडू नका. इथं भयंकर विषारी सर्प असतात.” असं सांगून ते गेले. मुलांची जेवणं झाली.
आम्ही सर्व शिक्षक गप्पा मारीत बसलो असताना त्या शाळेतला शिक्षक तिथे आला. रायगड आमच्या सहलीत नाही हे कळल्यावर तो म्हणाला,” रायगडच्या इतक्या जवळ येऊनही तुम्ही रायगड बघत नाही?” आता एसटीचे भाडं ही वाढणार आम्ही मुलांना विचारलं,” तुम्ही पैसे भरायला तयार आहात का?” सर्व मुलं तयार झाली. मी पहाटे चारला तिथून हाललो. साधारण पाच वाजता पायथ्याशी पोहोचलो. सूर्योदयाला मी रायगडावर पोहोचलो तर संपूर्ण रायगड त्या पिवळ्या जर्द उन्हात न्हात होता. जणू सर्वत्र सोनचं पसरल्यागत दिसत होतं. शि.म.परांजपे यांचा पूर्वी मी एक त्याच शाळेत धडा शिकवत होतो. एका खेड्यातील अनेक माणसे खोरं ,कुदळ व पाट्या घेऊन रायगड वर सोनं शोधायला येत. रायगडावर कुठेतरी सोनं आहे म्हणून त्या खेड्यातील माणसे रायगडावर येऊन कुदळीने उकरीत असत व दमून परत जात . एक दिवशी एक तरुण असच उकरून उकरून दमून कुदळ टाकून बसला. त्याला सबंध रायगड सोन्यानं भरलेला दिसला तो म्हणाला-“रायगडाच्या मातीत कुठं सोन नाही रायगडाच्या सर्व भागावर सोनं आहे” या पाठाची मला आठवण झाली.चारशेवर्षापूर्वीची हिरकणी जशी दिसली तसंच रायगडावरच सोनंही.या दोन्ही गोष्टींची मला तेव्हा प्रचिती आली.
श्री .रंगराव बापू पाटील,(ग्रामीण कथाकार)
कामेरी
९५६१२४३१६२














































































