Last Updated on 31 Mar 2025 7:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी केलेली वल्गना तसेच शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयावर गुढी पाडव्यादिवशी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला.
आज दिवसभरात कोल्हापूर , सांगली , परभणी , वाशिम , जालना , छत्रपती संभाजीनगर , सातारा , सोलापूर , बारामती याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
तांबवे येथे निषेध
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह तांबवे (ता. वाळवा) येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी काळी गुढी उभारून राज्य सरकारचा निषेध केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पाटील म्हणाले की महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी जाहिरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असे सांगून शेतकऱ्यांची मतं घेऊन फसवणूक करून महायुती सरकार सत्तेवर आले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना फटकारले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते शंकरआण्णा पाटील, शिवाजी पाटील, दत्ताजी पाटील, रविकिरण माने, चंद्रकांत पाटील, रामभाऊ जाधव, उत्तम पाटील, विकास शेळके, पंडित निकम, बाळासाहेब पाटील, दिलीप जाधव, माणिक जगताप, आण्णासाहेब जाधव यांच्यासह तांबवे, धनगरवाडी, नवे तांबवे,येवलेवाडी गावातील शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा – शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगताना लाज वाटली नाही का? : राजू शेट्टी
कोल्हापूर येथे निषेध
स्वाभिमानीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी सात वाजता गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांची सरकारने कर्जमाफीबाबत केलेली फसवणूक व कोल्हापूर सांगलीच्या जनतेवर व शेतकऱ्यावर शक्तीपीठचे संकट येत आहे, या संकटाचा निषेध म्हणून काळी गुढी उभा करून जाहीर निषेध करण्यात आला.

सांगली येथे निषेध
लाडक्या बहिणीला आणि शेतक-याला फसवून राज्य सरकार सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींना मानधन देता येणार नाही. तर शेतक-यांची कर्जमाफी नाकारण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ आज गुढीपाडव्यानिमित्ताने सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला आहे. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. राज्य सरकारचा निषेध करत आंदोलना दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भरत चौगुले, संजय बेले, संदीप राजोबा आदीसह अन्य शेतकरी उपस्थित होते..











































































