Last Updated on 06 Nov 2021 11:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सोलापूर |
लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असताना परदेशातील नागरिकांना यंदा दिवाळी फराळाची चव चाखता येते की नाही, अशी परिस्थिती असतानाच विमानसेवा सुरू झाल्याने टपाल विभागाने त्यांची पार्सल सेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे सोलापूरचा फराळ पोस्टाने परदेशात जात आहे.
दिवाळी सणात विदेशातील आपल्या आप्तस्वकीयांना पार्सलने फराळ पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे अमेरिका, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया येथे फराळ पाठविण्यात आला आहे.
रक्षाबंधन आणि दिवाळीनिमित्त शहरातील कुटुंबीयांकडून राखी आणि दिवाळीचा फराळ पाठविला जातो.कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने अनेक देशांकडून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागाची पार्सल सेवाही बंद झाली होती.रक्षाबंधनला परदेशात राहणाऱ्या भावापर्यंत बहिणीची राखी पोहोचली नाही.
पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक देशांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली. टपाल विभागानेही पार्सल पाठविण्याची सुविधा पूर्ववत सुरु केली. परदेशात राहणाऱ्या शहरातील नागरिकांपर्यंत दिवाळी फराळ पाठविणे त्यामुळे शक्य झाले. गेल्या १० ते १२ दिवसांपासून शहरातील जीपीओ टपाल कार्यालयाने दिवाळी फराळचे पार्सल पाठविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. या दिवसांत सुमारे शंभरहून अधिक पार्सल बुक झाली आहेत.











































































