Last Updated on 04 Dec 2021 5:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणी मजुरांची कुटूंबे शब्दशः उघड्यावर पडली.वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावातील चला गाव घडवूया चळवळीच्या ‘साद माणुसकीची’ सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 700 शेतमजुरांना सलग दोन दिवस उत्तम सकस भोजन देऊन मानवतेचे मनोहारी दर्शन घडवले.थंडी आणि पावसाने गारठून गेलेले ऊस तोडणी मजूर या विधायक कृतीने सुखावले.
गोटखिंडी गावात हुतात्मा व राजारामबापू कारखान्याची ऊस तोडणी गतीने सुरू आहे.पावसाने सातशेच्या दरम्यान असलेल्या या शेत मजूरांच्या झोपड्यात,चुलीत पाणी शिरले.झोपड्यातील संसार उघडा पडला.खाली धरती,वर आभाळ,कोसळणारा पाऊस,जगणं निराधार झालं.मिळेल त्या सार्वजनिक इमारतीचा आसरा घेऊन मजूर आणि कुटूंबीय थांबले.सोशल मिडीयावर मजुरांची दुरवस्था रंगू लागली.
गोटखिंडी गावातील संपत वारके, सुनील गावडे, धनंजय थोरात,प्रकाश पाटील,विक्रम पाटील,संदीप पाटील,अर्जुन सुतार,दत्ता माने,विनायक पाटील,संभाजी शिणगारे,राहुल गायकवाड,भीमराव मोरे, दिनकर बाबर,राजू शिनगर आदी नव्या जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीपासून ते जेवण तयार करून वाढण्यापर्यंतचे परिपूर्ण नियोजन व अंमलबजावणी अत्यंत गतीने केली. गोटखिंडी गावातील विठ्ठल मंदिरात ऊस तोडणी मजुरांच्या पंगती उठल्या. भूक शमवण्यासाठी जेवणारे आणि वाढणारे सगळेच आनंदून गेले.
कुसुमाग्रजांच्या कवितेतील, ‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा’ या ओळी वारंवार आठवत होत्या. विधायक कार्यकर्त्यांचे मोहोळ स्थलांतरित मजुरांचे दुःख हलके करण्यासाठी अविरतपणे झगडत होते. दरम्यान शेजारच्या येडेनिपाणी गावात सी.एच.पाटील व सहकाऱ्यांनी 400 मजुरांना जेवण दिले. हुतात्मा कारखान्याने कारखाना कार्यस्थळांवर 2 हजार मजुरांच्या जेवणाची सोय केली. कृष्णा कारखान्याने 5 हजार मजुरांना धान्य वाटप केले अशा सुखद बातम्या येतच आहेत.
अडचणीत सापडलेल्या,गरीब,स्थलांतरित माणसांकडे सर्वांचे लक्ष्य हवे.मदतीचे हात पुढे करणारांना काहीही कमी पडत नाही. ही पोस्ट लिहण्याचा हेतू. तुमच्या परिसरातील स्थलांतरित, मजूरांना तुम्ही बळ द्या.
जाता जाता गुलजारांच्या ओळी आठवल्या,
शहरभर में मजदूर जैसे दर बदर कोई न था,
जिसने सबका घर बनाया… उस का कोई घर ना था.














































































