Last Updated on 27 Dec 2023 7:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बुधवारी, दि.27 रोजी बैठक होत असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे.
मंगळवार दि. 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती.या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटणार होती.पण,जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी रजेवर गेल्यामुळे दि. 26 रोजी बैठक होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले होते.
दरम्यान,स्वाभिमानीने आज आक्रमक पवित्र घेत उद्यापासून ऊस आंदोलनाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आज पुन्हा हालचाली करत पुन्हा बैठकीचे नियोजन केले.
ही बैठक आता बुधवारी, दि.27 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.या बैठकीकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठीच्या आतापर्यंतच्या तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या आहेत.२६ डिसेंबरच्या बैठकीत कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली होती.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 12.50 उतार्यास 3250, साडेबारा उतार्याच्या आत असणारे 3150 रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने 3100 रुपये दर देतील,असा अंतिम प्रस्ताव दिला.पण,बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने 26 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन कारखानदारांनी दिले.तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय स्वाभिमानाने घेतला होता.या मुदतीत तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.दरम्यान,सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया – वसंतदादा, दालमिया कारखान्याने संघटनेच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे. मात्र इतर कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे.









































































