Last Updated on 25 Nov 2023 11:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | यंदाच्या उसाला पहिली उचल ३ हजार १०० रुपये आणि गतवर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता १०० रुपये द्या,या मागणीवर स्वाभिमानी ठाम आहे. कडेगावमधील सोनहिरा कारखान्यावर रविवारी, दि. २६ रोजी बैठक होणार आहे.पहिल्यांदा कारखानदारांची बैठक होईल,त्यानंतर कारखानदार आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक होणार आहे,अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिली.दरम्यान,या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.ऊस दराचा तोडगा निघणार का याबाबत उत्सुकता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या कारखान्याची एफआरपी ३,००० पेक्षा कमी आहे, त्यांनी प्रती टन १०० रुपये द्यावेत आणि उर्वरित कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रती टन ५० रुपये जादा द्यावेत,असा तोडगा निघाला आहे. ‘स्वाभिमानी’ने गेल्या वर्षीच्या उसाला प्रती टन ४०० रुपये आणि चालू हंगामासाठी उसाला प्रती टन ३,५०० रुपये दर मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन चालू केले होते गुरुवारी या मागण्यांसाठी पुणे ते बेंगळुरू महामार्गावर कोल्हापुरातील शिरोली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.५० व १०० रुपये द्यावेत असा निर्णय घेण्यात आला.या निर्णयानंतर ‘स्वाभिमानी’ने आंदोलन मागे घेतले.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली आहे. बैठकीस शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलविल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिली.ते म्हणाले, ऊस दराच्या आंदोलनाबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार आहे. बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा आहे. मात्र आमच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.









































































