Last Updated on 16 Jul 2025 10:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधान परिषदेत घोषणा
आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला होता प्रश्न
मुंबई । सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरजेच्या मिशन हॉस्पिटल चौक या रस्त्याच्या 18 कोटीचा अनावश्यक आणि कोणाचीही मागणी नसताना सुस्थितीतील रस्त्यावर खर्च केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. आमदार सदाभाऊ खोत यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ही घोषणा केली.
सांगली मिरज रस्त्याच्या या मुख्य कामासह सर्विस रस्ता आणि गेल्या तीन वर्षात या मार्गावर केलेल्या खर्चाची, शासनाच्या वेगवेगळ्या निधीतून केलेल्या दुबारकामांची चौकशी व्हावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली होती. या कामाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या उदगाव टोलनाका ते कोल्हापूर रोड (अंकली खोतवाडी, तारदाळ, जयपुर उदगाव) या रस्त्याचीही चौकशी करण्याची घोषणा सभागृहात करण्यात आली आहे.
विधान परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांनी सांगली- मिरज रस्ता आणि सर्विस रोड बाबतीत लक्षवेधी मांडली होती. याबाबत त्यांनी नागरिक जागृती मंचने मुख्यमंत्री आणि लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीचा हवाला दिला. लोकांची मागणी नसताना, गरज नसताना या रस्त्यावर 18 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. निविदेप्रमाणे काम न करता वरचेवर काम करण्यात आले आहे. याशिवाय गेल्या तीन वर्षात या सर्व रस्त्यांवर दुबार कामे झाली आहेत. कोणत्या रस्त्यावर कोणत्या योजनेतून कामे केली, ही कामे इस्टिमेट प्रमाणे झाली का? याची स्वतंत्र तांत्रिक आणि लेखापरीक्षणात्मक चौकशी करावी, बनावट कागदपत्रे सादर करून बिले काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याबाबत ही त्यांनी या रस्त्यावर सातत्याने खर्च केले जात असल्याचे आपल्या प्रश्नात म्हटले होते.
ठेकेदारांची बिले दिलेले नाहीत
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत उत्तर देताना सांगितले की, ही कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र त्यांची बिले देण्यात आलेली नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चीफ इंजिनियर मार्फत या कामांची चौकशी करण्यात येईल. या कामात शासकीय निधीचा अपय्यक किंवा भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई केली जाईल. त्यापूर्वी लिखित प्रश्नावर बोलताना भोसले यांनी, सांगली- मिरज रस्ता आणि कोल्हापूर रोडवरील कामांची माहिती दिली. विश्रामबाग चौक ते होंडा शोरूम या दोन २.८५ किलोमीटर रस्त्याचे काम दहा वर्षांपूर्वी झाले होते. त्याला 15 कोटी खर्च आला होता. 2018 ला त्याची कार्यपूर्ती झाली. रस्ता केल्यानंतर सहा वर्षांनी नव्याने कामासाठी 2023 मध्ये दहा कोटी रुपये मंजूर झाले. त्याची वर्क ऑर्डर डी.आर. कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला दिली. त्यांनी 12.70% कमी दराने निविदा भरली होती. ते काम पूर्ण झाले मात्र अद्याप त्याचे बिल अदा करण्यात आलेले नाही. कोल्हापूर रोडवरील काम चार वर्षांपूर्वी झाले होते. 2019 मध्ये कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चरने आठ कोटी रुपयांना 0.35% कमी दराने काम घेतले होते. त्यानंतर चार वर्षांनी आता काम झाले आहे त्याचीही चौकशी केली जाईल अशी घोषणा मंत्री भोसले यांनी केली.














































































