Last Updated on 05 May 2024 8:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्ह्यातील 44 सांगली लोकसभा व 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे मतदान दि. 7 मे 2024 रोजी आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ही विना अडथळा व भयमुक्त वातावरणात आणि नि:ष्पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारत निवडणूक आयोग यांच्याकडून शेवटच्या 72 तासाकरिता मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 5 मे 2024 रोजीचे 18:00 वाजलेपासून ते दि. 8 मे 2024 रोजीचे 18:00 वाजेपर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार वरील कालावधीत बेकायदेशीर सभा आणि सार्वजनिक बैठक आयोजित करण्यास मनाई केली आहे. पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास / गटागटाने फिरण्यास मनाई केली आहे. हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व लग्नविधी यांना लागू असणार नाही. तसेच दारोदारी प्रचार करण्याच्या अनुषंगान घरोघरी भेट देण्यास प्रतिबंध असणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला; दिग्गज रिंगणात, प्रतिष्ठा लागली पणाला
8 ते 22 मे कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी
त्याचबरोबर विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, यात्रा, जत्रा, उरूस आदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 8 मे 2024 ते 22 मे 2024 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 8 मे 2024 रोजीचे 03.00 वाजल्यापासून ते दि. 22 मे 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.










































































