Last Updated on 12 Mar 2025 10:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमिततेच्या चौकशीवरील स्थगिती सहकार कायदा कलम 88 अन्वये अपील सुनावणी घेऊन उठविण्यात येईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमितता प्रकरणी सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, यासंदर्भात सहकार आयुक्त यांच्या समिती मार्फत चौकशी करण्यात आली. यामध्ये नाबार्ड, सहकार कायदा व बँकेच्या पोट नियम यांचे उल्लंघन करून असुरक्षित कर्ज वाटप करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. या चौकशीस मागील काळात स्थगिती देण्यात आली होती. बँकेच्या माध्यमातून सूतगिरणी विक्री प्रकरणी कायद्यानुसार व्यवहार झाला की नाही, याची चौकशी करण्यात येईल. चौकशीत कायद्यानुसार व्यवहार झालेला नसल्याचे निदर्शनास आल्यास हा व्यवहार रद्द करण्यात येईल. तसेच बँकेतील नोकर भरती, फर्निचर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात येईल.













































































