Last Updated on 17 Jan 2022 11:36 AM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुर येथील कुमार पाटील यांची गाडी शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी उपयुक्त ठरणार
एक वर्षाची मेहनत;गाडीची अंतिम चाचणी झाली यशस्वी
सांगली । विनोद मोहिते
इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्ये वापरत चारचाकी गाडीची निर्मिती केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चार चाकीगाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या गाडीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्याने आज रविवारी कुमार पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
इस्लामपूर-पेठ रस्त्यावर विष्णूनगर येथे पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गेली वीस वर्षे ते व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत. हे करत असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का ? याचा विचार त्यांनी केला. एक वर्षापूर्वी त्यांना चार चाकी गाडीची कल्पना सुचली. लोखंडी साहित्य वापरताना दुचाकीचे इंजिन वापरण्याचे ठरले. १०० सी सी इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये सर्वांचा विरोध असताना दोन वेळा तयार झालेल्या चारचाकी गाडीचा सांगाडा मोडीत काढला. नवनिर्मितीचा ध्यास घेत पुन्हा ही गाडी तयार केली. गाडी तयार करीत असताना स्टेरिंग ऐवजी हॅण्डलचा वापर केला.
गिअर टाकून गाडी पाठीमागे सहज कशी घेता येईल का ? यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले आहे. इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गियरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला आहे.
तयार गाडीला शेती अवजारे कशी जोडता येतील ? यासाठी मित्रांशी चर्चा करून तशी अवजारे ही बनवलेली आहेत.कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते.सहज हाताळताना गाडीचा वापर शेतीला कसा करता येईल ? असा विचार केला गेलाय. पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीची ने आण करणे यासाठी सीटच्या मागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे.
श्री पाटील यांनी विष्णूनगर मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गाडीची चाचणी घेतली.१ लिटर पेट्रोलमध्ये १ एकर क्षेत्रातील कोळपणीचे काम ही चारचाकीगाडी करत आहे. अल्प वेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करत असल्याने शेतकऱ्यांना ती वरदान ठरणार आहे.
सांगली जिल्ह्यात तिसरी चार चाकी बनवली…!
अनेक जण हौस म्हणून चारचाकी गाडी बनवत आहेत. कुमार पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली गाडी कौतुकाचा विषय ठरत आहे.एक वर्षाची मेहनत व सुमारे ६० हजार रुपये खर्चून ही गाडी बनली आहे.नुकतेच देवराष्ट्रे येथील फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रय लोहार यांनी देखील अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचे इंजन वापरून जुगाड जिप्सी तयार केली आहे . याची दखल अगदी आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली होती . त्यामुळे ही गाडी सध्या चर्चेचा विषय बनली होती.त्या नंतर सांगली येथील एका सातवी शिक्षीत अशोक आवटी या मॅकॅनिकने अवघ्या ३० हजार रूपयांत फोर्ड कार १९३० ची प्रतिकृती बनविलेली आहे. ती एम ८० पासून जुगाड गाडी बनवली आहे.









































































