Last Updated on 24 Jan 2025 6:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मालेगाव । शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. सहकारातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन देशातील शेतकरी आत्मनिर्भर होईल. त्यासाठी शेतीला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शहा यांनी केले.
अजंग, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे व्यंकटेश्वरा को. ऑप. पॉवर ॲण्ड ॲग्रो प्रोसिसिंगच्या माध्यमातून आयोजित सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री श्री. शहा बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ, तापी खोरे व कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार छगन भुजबळ, आमदार दिलीप बोरसे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. शहा यांच्या हस्ते माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बेळगाव येथील काजू उद्योगाचे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन करण्यात आले.
केंद्रीय मंत्री श्री. शहा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सहकार विभागाची स्थापना केली. आगामी काळात सेंद्रीय शेती ही शाश्वत ठरणार आहे. या शेतीमुळे शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेता येईल. त्याबरोबरच पर्यावरण रक्षणास मदत होईल. सेंद्रीय शेती आणि या शेतीतून मिळालेल्या उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या माध्यमातून संस्थांची निर्मिती करण्यात येईल. जेणेकरून जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू शकेल. तसेच व्यंकटेश्वरा संस्थेने सुरू केलेले कार्य अनुकरणीय आहे. या संस्थेने उत्पादक ते निर्यातदार अशी मूल्य साखळी उभी केली. यामुळे सहकार क्रांतीला अधिकचे बळ मिळणार आहे. सहकाराचा पाया विश्वास असल्यामुळे ही संस्था या विश्वासास पात्र ठरणार आहे. याबरोबरच या संस्थेने जवान आणि किसान यांना जोडण्याचे काम केले. या संस्थेच्या माध्यमातून विविध फळ पिकांच उत्पादन घेतले जात आहे. या फळ पिकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगसाठी पुरेपूर सहकार्य केले जाईल.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, आमदार श्री. भुजबळ, माजी मंत्री डॉ. भामरे, डॉ. पवार, डॉ. महात्मे, डॉ. डोळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. डोळे यांनी संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, व्यंकटेश्वरा संस्थेतर्फे बेळगाव येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. तेथे रोज 24 टन काजू बियांवर प्रक्रिया करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी राज्यासह कर्नाटकमधील आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधकांनी चळवळ खिळखिळी केली…
विरोधकांनी खिळखिळी केलेल्या सहकार चळवळीला भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं बळ देत, नवसंजीवनी दिली, असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शरद पवार १० वर्ष कृषीमंत्री राहिले, तेव्हा सहकार मंत्रालय त्यांच्या अखत्यारित होतं. मात्र, सहकाराला बळकटी देत त्यांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत, केवळ स्वत:चाच लाभ पाहिला अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सहकार मंत्रालयाची स्थापना करुन, सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक पावलं उचलली याकडे शहा यांनी लक्ष वेधलं. राज्यातल्या आजारी सहकारी साखर कारखान्यांचा प्राप्तीकराचा मुद्दा संपुष्टात आणून ४६ हजार कोटींचा करबोजा कमी करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. तसंच सहकारी कारखान्यांना १० हजार कोटींचं कर्जही उपलब्ध करुन दिलं असं ते म्हणाले. सहकार चळवळीला विज्ञानाची जोड दिली तर आजही शेती व्यवसाय नफ्याचा ठरु शकतो, यात कोणतीही शंका नाही, असं शाह म्हणाले.









































































