Last Updated on 26 Jul 2025 2:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत असून ती नियंत्रित ठेवण्यासाठी आज 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट उघडून 16,565 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 18,665 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याआधीही 15 जुलै ते 24 जुलै या नऊ दिवसांच्या कालावधीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्या कालावधीत एकूण 10 टीएमसी पाणीसाठा नदीपात्रात विसर्गीत करण्यात आला होता. महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी बंद करण्यात आले होते. आज पुन्हा कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट उघडून 16,565 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 133 मिलिमीटर, नवजाला 188 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी 26 जुलै 2025 सकाळी 8 पर्यंतची आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 776 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 989 आणि महाबळेश्वरमध्ये 3 हजार 013 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 81.87 टीएमसी इतका झाला असून धरण 77.79 टक्के भरले आहे. कोयना धरणात प्रति सेकंद 42,588 क्युसेक्स (3.67 टीएमसी) पाण्याची आवक सुरू आहे.
प्रमुख धरणातून असा पाण्याचा विसर्ग सुरु
1. धोम बलकवडी 1127 क्युसेक
2. धोम 2000 क्युसेक
3. कण्हेर 2700 क्युसेक
4. उरमोडी 0 क्युसेक
5. तारळी 6800 क्युसेक
6. कोयना 18665 क्युसेक










































































