Last Updated on 19 Nov 2021 6:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.मात्र,आंदोलन सध्याच परत घेणार नाही.आंदोलन तोपर्यंत सुरूच राहाणार जोपर्यंत कृषी कायदे संसदेमध्ये रद्द होत नाहीत,अशी प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे.संसदेत ज्या दिवशी हे कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहू,असेही राकेश टिकैत म्हणाले आहेत.त्यामुळे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला असला तरी शेतकरी आंदोलन इतक्यात संपण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत.
राकेश टिकैत यांनी एक ट्विट करून ही घोषणा केली आहे.आंदोलन तात्काळ मागे घेतले जाणार नाही.ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील,त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत,असे टिकैत यांनी म्हटले आहे.सरकारने एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी,अशी मागणीही टिकैत यांनी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेतले असल्याची घोषणा केली. हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते. आम्ही चांगली नियत ठेऊनच हे कायदे आणले पण शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो, असं म्हणत हे तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.आज प्रकाशपर्व आहे, ही कोणाला दोष देण्याची वेळ नाही, आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं पंतप्रधान मोदी आज म्हणाले. तर या महिन्याच्या अखेरपर्यंत संसदेच्या अधिवेशनात कायदे रिपिल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.









































































