Last Updated on 30 May 2025 6:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकरी निवडीचे निकष शेतकऱ्यांचे वय २५ ते ६० वर्ष तसेच इयत्ता बारावी पास असे होते. परंतु कृषी आयुक्त यांच्या राज्यस्तरीय बैठकीत या निकषात बदल करण्यात आले आहेत.
किमान शिक्षणाची व वयाची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच महिलांचे शेतीतील योगदान लक्षात घेता परदेश दौऱ्यासाठी महिलांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.
सन २०२४-२५ मध्ये या योजनेत युरोप, ब्राझील, ऑस्ट्रोलिया व थायलंड या देशांची अभ्यास दौऱ्यांकरीता निवड करण्यात आली होती. परंतु या आर्थिक वर्षात युरोप, इस्त्राईल, चीन, जापान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरिया या देशांचा या देशांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेतंर्गत निकषामध्ये बदल केल्यामुळे सन २०२५-२६ मध्ये करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची यापुर्वी निवड झालेली हेाती ते नव्याने अर्ज करु शकतात व पात्रतेनुसार त्यांचाही विचार या योजनेंतर्गत केला जाईल, असे सातारा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.














































































