Last Updated on 30 Jan 2025 8:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर : भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच PM किसान, पीक विमा, कृषी विभागाच्या सर्व वैयक्तीक लाभाच्या योजना आदींच्या लाभासाठी सर्व शेतक-यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले जाणार असल्याने सर्व शेतक-यांनी ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक किंवा ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वाळवा – इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजीटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतक-यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजीटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उददेश आहे. प्रकल्पामुळे माहिती आधारीत योग्य निर्णय घेणे, गरजू शेतक-यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
ॲग्रीस्टॅक योजनेचे अपेक्षित फायदे पुढील प्रमाणे :
⏩ PM-Kisan योजनेतील आवश्यक अटी पुर्ण करून शेतक-यास लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता.
⏩ PM-Kisan योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थीचा समावेश.
⏩ पिक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता.
⏩ पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचे सर्वेक्षणामध्ये सुलभता.
⏩ किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.
⏩ शेतक-यांना सेवा देणा-या यंत्रणांना सदर सेवेसाठी सुलभता.
⏩ शेतक-यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले उपलब्ध होणे, विविध संस्थांना शेतक-यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढ.













































































