Last Updated on 23 Oct 2024 8:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने जाहीर केली आहे. भाजपनंतर महायुतीमधील उमेदवारी जाहीर करणारा शिंदे गट हा दुसरा पक्ष ठरला आहे. खानापुर आटपाडी मतदारसंघातून सुहास बाबर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, उदय सामंत, दिपकी केसरकर, तानाजी सावंत, भरत गोगावले अशी शिवसेनेच्या बड्या नेत्यांची नावे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर साक्री (अज) विधानसभा मतादरसंघातून श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित, चोपड्यातून चंद्रकांत बळवंत सोनावणे, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, एरंडोलमधून अमोल पाटील, पाचोऱ्यातून किशोर पाटील, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत निंबा पाटील, बुलढाण्यातून संजय गायकवाड, मेहकरमधून डॉ. संजय रायमुलकर, दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत अडसूळ हे निवडणूक लढतील.
राजापूरमधून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, उदय सामंत आणि किरण सामंत हे सख्खे भाऊ एकाच वेळी निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून खासदार बनलेले रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना संधी देण्यात आली आहे.तर छत्रपती संभाजीनगरचे खासदार बनलेले संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे यांना पैठणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिल्या यादीत मुंबईतून ६ जणांना संधी
शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईतून ६ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या 6 जणांमध्ये 2 महिला उमेदवार आहेत. मनीषा वायकर, दिलीप लांडे (चांदीवली), प्रकाश सुर्वे (मागाठाणे), मंगेश कुडाळकर (कुर्ला), सदा सरवणकर (माहिम) आणि यामिनी जाधव (भायखळा) यांचा समावेश आहे.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर करताना मुख्यमंत्री यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीली आहे. त्यात ते म्हणतात की – जय महाराष्ट्र हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.
हेही वाचा – मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी












































































