Last Updated on 14 Aug 2025 8:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अंमली पदार्थांच्या व्यसनांमुळे कुटुंब व्यवस्था ढासळते. युवा पिढीने आपले पालक, कुटुंब आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे; असे आवाहन इस्लामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये कॉमर्स विभाग व अंतर्गत तक्रार निवारण कक्ष यांच्यावतीने आयोजित अंमली पदार्थ मुक्ती व व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने प्रबोधन पर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात अरुण पाटील मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.एम.जाधव तसेच समन्वयक प्रा.डॉ.मंगल लोंढे यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी करून दिला.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील म्हणाले, अमली पदार्थ व व्यसनांच्या आहारी गेल्यावर बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे संबंधित व्यक्ती व संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हरवून जाते. अशा व्यसनाधीन व्यक्तींना पूर्णपणे वाळीत टाकण्यापेक्षा त्यांचे देखील चांगले समुपदेशन करून त्यांना चांगल्या प्रवाहात आणता येते. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यवसाय- उद्योग अशा अनुषंगाने अनेक क्षेत्रात करिअर साठी वेळ द्यावा; याबाबत विवेचन केले.
संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील म्हणाले, आपली शिक्षण संस्था आणि संकुलातील प्रत्येक शाखांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. व्यसनांपासून दूर राहून चांगल्या मित्रांची संगत करावी. आपल्या उज्वल भवितव्यासाठी परिश्रम घ्यावेत. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. जाधव यांनी; महाविद्यालयात सुरू असलेल्या सर्व शाखांबद्दल व कोर्सेसबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास बीए, बीकॉम, एम कॉम व ज्युनिअर विभागाचे विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. प्रा.गणेश स्वामी यांनी सूत्रसंचालन तर प्रा.स्मिता पाटील यांनी आभार मानले. प्रा.प्राची कांबळे,प्रा.किरण मेनकुदळे आदी सहकाऱ्यांनी संयोजन केले. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके व पोलीस सहकारी करिष्मा दळवी, सविता राठोड उपस्थित होत्या.









































































