Last Updated on 18 Nov 2024 7:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थंडावली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान होईल. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार पात्र ठरले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यात १५३ कोटी रुपयांहून अधिक रोख, २८२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. सर्वाधिक २२९ कोटी रुपयाच्या मालमत्तेची जप्ती मुंबई उपनगर जिल्ह्यात झाली आहे.
साभार : प्रसार भारती









































































