Last Updated on 15 Jul 2025 9:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती व अमृत संस्थांच्या सहकार्याने, तसेच सामाजिक न्याय विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सहाय्य जनजागृती उपक्रम आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अभियानांतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात बोलताना बार्टी सांगलीचे समतादूत अंकुश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्राथमिक शिक्षणापासून पीएच.डी. पर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्या वेतन योजना, प्रशिक्षणपूर्व संधी, तसेच देशांतर्गत व परदेशातील उच्च शिक्षणासाठी विशेष योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, नेट/सेट परीक्षेसाठी प्रशिक्षणासह विविध कोर्सेससाठी संधी उपलब्ध आहेत. “विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा व इतरांनाही याबाबत माहिती द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी माहिती मिळवण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात निर्मल व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक डॉ. दीपक मुकादम यांनी अमली पदार्थ प्रतिबंध व मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन करताना व्यसनाधीनतेची कारणे व त्याचे परिणाम विशद केले. “तात्पुरत्या आनंदासाठी आयुष्य उध्वस्त होऊ देऊ नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी सारथी शिष्यवृत्तीचे कनिष्ठ सहाय्यक दीपक चौगुले, प्रा. डॉ. मंगल लोंढे, प्रा. डॉ. अशोक शिंदे व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने करण्यात आले होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. गोरखनाथ किर्दत यांनी, सूत्रसंचालन प्रा. गणेश स्वामी यांनी, तर आभार प्रा. ओंकार कोकाटे यांनी मानले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.













































































