Last Updated on 19 Oct 2024 10:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी श्रीमती विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं काल जारी केला. या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. सध्या त्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत.
भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजयाताईंनी “सक्षमा”, “प्रज्ज्वला”, “सुहिता” यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबविले. “सक्षमा” उपक्रमा मधून ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे.
संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. १९९२मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.










































































