Last Updated on 13 Sep 2025 9:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाळवा तालुक्यात सेवा पंधरवडा अंतर्गत शिवपाणंद रस्ते मोहीम प्रभावीपणे राबवणार – तहसीलदार सचिन पाटील
सांगली । महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये ‘सेवा पंधरवडा’ राबवण्यात येत असून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यात या मोहिमेला सुरूवात झाली आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. पहिल्या टप्प्यात (१७ ते २२ सप्टेंबर) शिव पाणंद रस्ते विषयक मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार सचिन पाटील यांनी माहिती दिली की, हे अभियान ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’, ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक उपक्रम आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करुन ‘नाविन्यपूर्वक उपक्रम’ अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता मिळावा अशी शासनाची भूमिका आहे. यासाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना आणली जाणार आहे. या अनुषंगाने सेवा पंधरवडा अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये १७ ते २२ सप्टेंबरच्या कालावधीमध्ये शिव पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक / वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. सीमांकनासाठी रस्त्यांच्या किनारी वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला परवडणारे व सुरक्षित घर मिळाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य शासन देखील प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने २३ ते २७ सप्टेंबरच्या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वासाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात येईल.
“आजच्या यांत्रिकी शेतीच्या काळात शेतापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य व कायदेशीर रस्ते असणे ही शेतकऱ्यांची मूलभूत गरज आहे. शासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे केवळ शेतीकाम सुलभ होणार नाही, तर भविष्यातील वादविवादही कमी होतील. सरपंच उपसरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”
श्रीनिवास अर्जुन
प्रांताधिकारी,
वाळवा – शिराळा उपविभाग









































































