Last Updated on 24 Jun 2023 10:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंढरपूर | आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मीणी दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे.यापुढे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असताना विठ्ठलाचे मूखदर्शन सुरु राहणार आहे.
राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (24 जून) एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचा निर्णय झाला. यापूर्वी शासकीय महापूजा सुरु होण्यापूर्वी मंदिर काही काळ बंद असायचे. त्यामुळे वारकरी आणि भक्तांना पांडुरंगाचे दर्शन मिळायचे नाही. मात्र,विद्यमान सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याने भाविकांचा मूखदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे अडीच वाजता सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करणार आहेत.या महापूजेच्या कालावधीत भाविकांसाठी मुखदर्शन बंद ठेवले जाते.त्यामुळे रांगेवर ताण येतो.आता भाविकांचा ताण कमी करण्यासाठी शासकीय महापूजेच्या कालावधीत भाविकांना विठ्ठल रखुमाईचे मुखदर्शन करता येणार.तसेच शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी साठीचे दर्शन देखील बंद करण्यात येईल.हा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या उपस्थितीत आषाढी यात्रा नियोजनाच्या बैठकीत पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला.









































































