Last Updated on 05 Jun 2020 6:01 AM by
हिंदू धर्मात सगळे सण हे हिंदू नववर्षाप्रमाणेच साजरे केले जातात. त्यामुळे भारतात जवळपास सगळेच छोटे-मोठे सण हे अतिशय जल्लोषात साजरे केले जातात. हिंदू धर्मातील महिला या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वर्षातून एकदा उपवास करते. तो उपवास म्हणजे वटपौर्णिमेचा. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले असल्याची अख्यायिका आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी अशी करा पूजा:
या व्रताची पूजा करण्यासाठी विवाहित महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करायची असते. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर साज श्रृंगार करून पूजेसाठी सज्ज व्हावं. त्यानंतर पूजेसाठी आवश्यक असं ताट तयार करावं.
या ताटात गूळ, भिजवलेले चणे, मिठाई, पानाचे विडे, पाच प्रकारची फळं, तुपाचा दिवा, दूध, एका भांड्यात पाणी, दोरा आणि अगरबत्ती हे असायला हवं. यानंतर वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करावी. या दिवशी वडच्या झाड्याजवळ जाऊनच पूजा करावी. वडाची फांदी तोडून तिची पूजा करू नये. सर्वात आधी झाडाजवळ जाऊन तिथे दूध आणि पाणी घालावे. त्यानंतर दिवा ठेऊन तिथे अगरबत्ती आणि धूप दाखवावा. यानंतर ताटातील फळं आणि विड्याची पानं ठेवावीत. यानंतर सात फेऱ्या मारून दोरा झाडाभोवती गुंडाळावा.
याचवेळी पूजा करताना ईश्वराकडे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. यानंतर इतर महिलांना आपलं वाण द्यावं. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासही करावा. तसंच ईश्वर चिंतनही करावं. यामुळे आपलंही मन प्रसन्न आणि प्रफुल्लित राहिलं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वटपौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
वटवृक्षाचे पूजन करतांना
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात. –
स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा.
वटपौर्णिमा या व्रताच्या पूजनामध्ये पाचच फळे अर्पण करण्यामागील शास्त्र
‘कोणत्याही पूजाविधीत पाच फळे अर्पण करण्याला महत्त्व आहे. फळे ही मधुर रसाशी, म्हणजेच आपतत्त्व दर्शक असल्याने पाच फळांच्या समूच्चयाकडे आकृष्ट आणि प्रक्षेपित होणार्या देवतांच्या लहरी अल्प कालावधीत जिवाच्या कोषांपर्यंत झिरपू शकतात. यामुळे जिवाला देवतेच्या चैतन्य लहरींचा खोलवर आणि दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते; कारण जिवाचा देह हाही पृथ्वी आणि आपतत्त्वात्मक आहे.’













































































