Last Updated on 08 Sep 2024 5:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महायुती सरकारने त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. कधी सरकारने योजनेची मुदत वाढवली तर कधी लाडक्या बहिणींना कागदपत्रांमध्ये सुट दिली होती. आताच नुकतीच सरकारने या योजनेची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत सप्टेंबर 2024 मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-सीआरपी ( एनयूएम, एमएसआरएलएम व माविम), मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा 11 प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीबाबत देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महिलांनी केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज सादर करावे लागणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.










































































