Last Updated on 26 May 2025 6:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या, २७ मे रोजी रेड अलर्ट
मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज
मुंबई । राज्याच्या हवामान इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे.
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्यानं मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे.
भारतीय हवामान खात्याने पावसाचा कोल्हापूर जिल्ह्यात आज दिनांक २६ मे रोजी ऑरेंज अलर्ट व उद्या दिनांक २७ मे रोजी रेड अलर्ट दिला आहे.

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला.
बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.
फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.
रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.
मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.
मुंबई उपनगर रेल्वेसेवेला पावसाचा फटका बसला आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वेसेवा प्रभावित झाल्या आहेत. मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.









































































