Last Updated on 25 Apr 2023 4:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । पुन्हा एकदा आता बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.यामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, बुधवारपासून देशातील अनेक भागात हलका तर पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच शुक्रवारपासून उत्तर-पश्चिम मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.यासोबतच मंगळवार ते गुरुवारपर्यंत महाराष्ट्र,तेलंगणा आणि दक्षिण मध्यप्रदेशच्या अनेक भागात वादळी वारे वाहू शकतात.
त्याचबरोबर 25 आणि 26 एप्रिल रोजी विदर्भातील भंडारा चंद्रपूर,गडचिरोली,यवतमाळ,अमरावती,बुलढाणा,वाशिम या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर गारपीट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्राला अवकाळी पावासाचा चांगलाच फटका बसला आहे.राज्यातल्या अनेक भागात अजूनही अवकाळी पाऊस पडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अशामध्ये हवामान खात्याने नुकताच वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासोबतच गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडला आहे.








































































