Last Updated on 01 Apr 2022 8:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त
नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो
पाईपद्वारे स्वयंपाकाचा पीएनजी आता ३६ रुपये प्रति एससीएम
मुंबई |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धित कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.
महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.
नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल.
पर्यावरणपूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूचा पीएनजी म्हणजेच घऱगुती वापर होतो. तसेच सीएनजीवर चालणारी मोटार वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने यांमध्ये मोठ्या प्रमाणात सीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर साडे तेरा टक्केवरून ३ टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.









































































