Last Updated on 24 Dec 2025 6:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्व. जयवंतराव भोसले यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजन; राज्यातील नामवंत संघांचा सहभाग
सांगली । कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे दि. २७ व २८ डिसेंबर रोजी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील क्रीडा मंडळ व नृसिंह गणेश मंडळाच्यावतीने आयोजित स्पर्धेचे यंदा २६ वे वर्ष आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले व फलटण पंचायत समितीचे माजी अध्यक्ष विश्वजीतराजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कबड्डी स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी होणार असून, ६५ किलो वजन गटात सामने खेळविण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्या संघासाठी रोख २५ हजार व चषक, द्वितीय २० हजार व चषक, तृतीय १५ हजार व चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, वैयक्तिक बक्षीसेही प्रदान केली जाणार आहेत.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. २८ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता माजी मंत्री आमदार जयंत पाटील आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी आबासो यादव (मोबा. ९८२२८३०५०१) अथवा विजय पाटील (मोबा. ९२२५८१४५०३) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक डॉ. विश्वास पाटील यांनी केले आहे.














































































