Last Updated on 20 Oct 2022 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या पदांच्यापरीक्षा आता टीसीएस,आयबीपीएस या संस्था घेणार आहेत.याद्वारे 75 हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत गृह, महसूल, पणन, उच्च व तंत्र शिक्षण ते वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विभागांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येऊन अनेक निर्णय घेण्यात आले.
मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.
या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परिक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील.









































































