Last Updated on 10 Jul 2022 10:51 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पंढरपूर ।
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती.अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मान मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.
आषाढी एकादशी निमित्त श्री. शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (52) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (47) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय,मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास राज्य निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तींवर संमती दिली.त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होण्याचा मार्ग मोकळा झाला.शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली.त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे
आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर या निमित्ताने एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. चार पिढ्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत. विठ्ठलाच्या महापूजेवेळी त्यांच्यासोबत वडिल, मुलगा आणि नातूही होता.
आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये लाखो वरकऱ्यांनी गर्दी केली आहे. आळंदी आणि देहूवरून निघालेल्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पायी चालत विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
पहाटेपासूनच वारकऱ्यानी चंद्रभागेमध्ये स्नान करायला सुरुवात केली आहे. स्नान आटोपल्यानंतर भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुढे जात आहेत.
वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण

आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले.
यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, बंडू जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रविंद्र फाटक, राणा जगजीतसिंह पाटील,माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.











































































