Last Updated on 09 Sep 2021 5:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड
मुंबई : राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून 15 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे.
पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्यादृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांचा सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे. या आज्ञावलीचा उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे.करंजपाडा येथे प्रायोगिक तत्वावर यशस्विरित्या करण्यात आला आला असून ई-पीक पाहणी प्रकल्पापूर्वी राज्यातील 20 तालुक्यांमध्ये या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.

ई-पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे.आणि तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होईल. ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह उपलब्ध होऊ शकेल. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.
ई-पीक पाहणीचे फायदे-
शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे शक्य होणार आहे.
खातेनिहाय आणि पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्याकडून देय ठरणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येईल. खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भारपाई शक्य होणार आहे. कृषि गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या करता येईल.
ई-पीक पाहणीचे टप्पे आणि कालावधी
ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल. 15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठी ती कायम करतील. खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. 1 ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात.
एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा र्स्माटफोन वापरता येईल. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना विविध सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याने आणि ही प्रक्रीया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला यात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने आवश्यक प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या प्रणालीची माहिती घेतल्यास येत्या काळात त्याला ई-पीक पाहणी उपयुक्त ठरू शकेल.
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी?
- गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.
- पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा.
- जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल.
- हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी हंगाम निवडू शकता.
- पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र दर्शविले जाईल.
- पिकांच्या वर्गामध्ये एक पीक पद्धती, मिश्र पीक, पॉलीहाउस पीक, शेडनेटहाउस पीक, पड क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.
- जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावी.
- पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडावा.
- पीक पर्याय निवडून शेतातील पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळ झाडांची संख्या व क्षेत्र नमूद करावे.
- मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होवू नये.
- चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.
- जल सिंचनाचे साधन पर्यायाखाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.
- त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.
- शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.
राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड
स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे.
राज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात (१.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे (९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती (८१ हजार) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे.









































































