Last Updated on 28 Sep 2024 9:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
येळावी, कवलापूर, येडेनिपाणी, वाटेगाव, समडोळी, वसगडे, नागठाणे ग्रामपंचायतींची बाजी
सांगली । ‘माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सांगली जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला. १६ ग्रामपंचायतींनीही अभियानात यश मिळविले असून ९ कोटी २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ‘अभियान ४.०’ चा राज्यस्तरीय निकाल आज जाहीर झाला. जिल्हा परिषदेसोबत दहा हजारांहून अधिक लोकसंख्येमध्ये कासेगाव राज्यात तिसरे, अडीच ते पाच हजार लोकसंख्येत नांगोळे, पाच ते दहा हजार लोकसंख्येत येडेनिपाणीने पहिला क्रमांक असे यश मिळवले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२०पासून हे अभियान सुरू आहे. अभियानाचा चौथा टप्पा १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. त्यातून जिल्हा परिषदेने राज्यात बाजी मारली.पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२ हजार २१८ ग्राम पंचायती अशा २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला.
ग्रामपंचायत गटामध्ये दहा हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले कासेगावने राज्यात तृतीय क्रमांक मिळाला असून १.२५ कोटीचे बक्षीस मिळणार आहे. राज्यस्तर उत्तेजनार्थ पुणे विभागात येळावी व कवलापूर ग्रामपंचायती आल्या असून त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये मिळतील. पाच हजार ते दहा हजार या लोकसंख्या गटामध्ये येडेनिपाणी राज्यात प्रथम आले. दीड कोटींचे बक्षीस मिळणार आहे. राज्यस्तरावर उत्तेजनार्थ वाटेगाव व समडोळी या दोन ग्रामपंचायती आल्या आहेत. त्यांना प्रत्येकी ७५ लाख, विभागस्तरावर वसगडे व नागठाणे ग्रामपंचायती आल्या असून त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये मिळतील.
अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली. पुणे विभागात बोरगाव व घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतींनी बाजी मारली. भूमी थिमॅटिकमध्ये उंचउडी प्रकारात लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ) व खंडोबाचीवाडी (ता. पलूस) ग्रामपंचायतींनी यश मिळविले. पुणे विभागामध्ये बोरगाव व घाटनांद्रे या ग्रामपंचायती असून अनुक्रमे ५० लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस निळणार आहे.भूमी थिमॅटिकमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुणे विभागामध्ये कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) व कौलगे (ता. तासगाव) ग्रामपंचायती यशस्वी झाल्या.
या अभियानासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
अभियानात यश मिळविलेल्या ग्रामपंचायतींना लाखो रुपयांची बक्षिसे मिळाली आहेत. ती अशी : कासेगाव १ कोटी २५ लाख, येळावी व कवलापूर प्रत्येकी १५ लाख, येडेनिपाणी एकूण २ कोटी २५ लाख, वाटेगाव ७५ लाख, समडोळी ७५ लाख, वसगडे व नागठाणे प्रत्येकी १५ लाख, नांगोळे एकूण १ कोटी ५० लाख, बोरगाव ५० लाख, घाटनांदे १५ लाख, लंगरपेठ व बनेवाडी ५० लाख, खंडोबाचीवाडी, कुंडलापूर व कॉलगे प्रत्येकी १५ लाख. एकूण ९ कोटी २५ लाख रुपयांची बक्षिसे जिल्ह्याला मिळणार आहेत.












































































