Last Updated on 16 Jul 2020 9:44 AM by
मुंबई : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज करोनामुळे निधन झाले.‘कोरोना’चा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते.तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या.नीला सत्यनारायण या १९७२ च्या सनदी अधिकारी होत्या.त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अतिशय चांगले काम केले होते. अतिशय कडक अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख होती. नीला सत्यनारायण यांनी ३७ वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले.नीला सत्यनारायण कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी आणि तरल मनाच्या लेखिकाही होत्या.प्रशासनासोबतच लिखाणावरही त्यांची मजबूत पकड होती संवेदनशील कवयित्री,स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या.नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तके लिहिली.याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.उद्योजक व्यवसायाशी संबंधित त्यांनी लिहिलेले ‘सत्यकथा’ आणि वनविभागाच्या सचिव म्हणून आलेल्या अनुभवांवरील ‘एक दिवस (जी)वनातला’ हे पुस्तकही गाजले होते.













































































