Last Updated on 25 Oct 2024 9:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार आहेत. उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना दिल्या जातील, अशी माहिती काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज दिली.
राज्यात विधानसभा निवडणूक हरण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची मोडतोड करून या अफवा पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
मविआमधल्या जागावाटपाचं नवं समीकरण आज, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलं. आघाडीतले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन प्रमुख पक्ष, प्रत्येकी ९० जागा लढवणार आहेत. अर्थात ९०-९०-९० असं हे नवीन समीकरण असून उर्वरित १८ जागांवर मित्र पक्षांशी दिल्या जातील, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.
तर दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये ५५ जागांवर चर्चा झाल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाविकास आघाडीत एकमत झालेलं नाही अशा ५ ते ७ जागा आहेत. त्या जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार का याचा निर्णय अजून झालेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.












































































