Last Updated on 19 Aug 2025 12:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोयना धरणातून 67 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू
मुंबई । राज्यातील बहुतांश भागात अत्यंत मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आता आज मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीही मुंबई पुण्यासह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे नऊ फुटांनी उघडले जाणार आहे. 11 वाजता कोयना धरणातून 67 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे विदर्भातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
हवामान विभागाने सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. त्यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट माथ्याचा समावेश आहे. येथे उद्या काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, दुर्गम ठिकाणी अति मुसळधार पावसाची भीती व्यक्त करण्यात आलीय. हवामान विभागाने चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोलीचा समावेश आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत असताना प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची 3.9 मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने जवळपास 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. त्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळचा समावेश आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. या काळात वाऱ्याचा वेग साधारणतः 30-40 किमी प्रतितास राहील.
10 लाख एकर शेती पाण्याखाली, पंचनामे दोन दिवसात

राज्यातील 10 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. पंचनामे काम करण्याचे काम सुरू होतील. जिथे पुराचा फटका, पावसाचा फटका बसला आहे, तिथे बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर जलसंपदा विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे पाणी सोडताना खबरदारी घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरण १०० टक्के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून १५०० क्युसेक्स ने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. विसर्ग सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणातून 67 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 8 फुटांवरून 9 फुटापर्यंत उघडून 65,600 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 67,700 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सतर्कतेचा इशारा
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून आज 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 23000 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो 28,355 क्युसेक करण्यात आला आहे व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 29985 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.
मुंबईत मुसळधार
गेल्या चार दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. कोकण आणि मुंबई भागात अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस कोसळत आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
भिवंडी शहरात व ग्रामीण भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भाजी मार्केट, बाजारपेठ व तीन बत्ती परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले असून बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. तर काही दुकानांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे मालाचे नुकसान झाले आहे.
कोकणाला झोडपले
गेले काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अति ते अति मुसळधार पाऊस सुरु असल्याने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी काही सखल भागात साचण्यास सुरुवात झाली आहे. जगबुडी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अति मुसळधार पाऊस सुरु आहे.
कोल्हापूर – गगनबावडा रस्ता वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दस्तुरी चौक, कळे येथे बॅरिकेट लावून गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवण्यात येत आहेत..तसेच कोल्हापूर – राजापूर हा राज्य मार्ग*सुद्धा बाजारभोगाव या ठिकाणी पाणी आल्यामुळे बंद झाला आहे. बंदोबस्त नेमण्यात आल्याची माहिती कळे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी दिली.
सतर्कतेचा इशारा
कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेठेवण्यासाठी धरणातून आज रोजी सकाळी 9 नंतर वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा 1310 क्युसेक विसर्गामध्ये 1300 क्यूसेक ने वाढ करून वक्रद्वारातून 2610 व विद्युतगृहातून चालू असणारा 300 क्युसेक असा एकूण 2910 क्युसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सोडण्यात येत आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. पावसाचे प्रमाण चालू अथवा वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी/जास्त करण्यात येईल.
तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.








































































