Last Updated on 27 Jan 2024 6:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अटल भूजल योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या भूजल समृध्द ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायतीस प्रथम, बोरगाव ग्रामपंचायतीस व्दितीय तर तासगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख, 30 लाख व 20 लाख अशी बक्षिसाची रक्कम असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली चे वरिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी गावा – गावांमध्ये सुदृढ स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडील दि. 9 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीकरिता सन 2022-23 साठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सन 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील योजनेत समाविष्ट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या 12 जिल्ह्यातील 270 ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एकूण 550 गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे मूल्यांकन उपविभाग स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरावर करण्यात आले.
राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांकास 1 कोटी, व्दितीय 50 लाख व तृतीय क्रमांकास 30 लाख रूपये आहे. ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम अटल भूजल योजनेंतर्गत राज्यास प्राप्त होणाऱ्या प्रोत्साहन निधीमधून अदा केली जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.









































































