Last Updated on 15 Feb 2021 5:53 PM by
भिवंडी : शेतीत काय राम राहिलेला नाही. शेतीत नुकसान होते, अशी ओरड सर्वत्र पसरलेली असतानाच भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी-उद्योजक जनार्दन भोईर यांनी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे हा शेतकरी उद्योजक तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केले. गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसायानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले. स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावे लागते. तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले .
त्यांचे नवे कोरे हेलिकॉप्टर 15 मार्च रोजी मिळणार आहे. हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते. त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड. हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. आज गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जनार्दन भोईर यांनी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सदस्यांना फेरफटका मारून आणला. भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. ग्रामीण भागात श्रीमंती दिसत आहे.














































































