Last Updated on 11 Oct 2021 1:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांची माहिती
नवी दिल्ली :
भारत २०२५ मध्ये इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या वाटेवर आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. एका बैठकीत बोलताना इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, देशात सध्याच्या ८.२ टक्क्यांच्या इथेनॉल मिश्रणावरून २०२५ पर्यंतच्या २० टक्क्यांपर्यंतचे इथेनॉल उत्पादन करणे शक्य होणार आहे.
२०२१ मध्ये देशातील इथेनॉल उत्पादन क्षमता ६ बिलियन लिटरची आहे. यामध्ये रस, शिरा यावर आधारित ५ बिलियन युनिट लिटरचा समावेश आहे. वर्मा यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनेक प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून इथेनॉल उत्पादन युनिट सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शविण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे सुमारे ८०० योजनांची नोंदणी करण्यात आली आहे. काही साखर कंपन्या दुहेरी इथेनॉल युनिट स्थापन करीत आहेत. ऊस तसेच मोलॅसीससह मक्का आणि धान्याचा वापर करून इथेनॉल निर्मिती केली जाईल. त्यामुळे २०२५ पर्यंत, जवळपास १० बिलियन लिटर इथेनॉलचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी पुरेशी क्षमता असेल.
इथेनॉल व परकीय चलन
दरम्यान,२०२०-२१ मध्ये भारताने १८५० लाख मे. टन एवढे पेट्रोलियम आयात केले. त्यावर जवळजवळ ५५ बिलियन डॉलर्स म्हणजे ४ लाख १२ हजार कोटींपेक्षा जास्त परकीय चलन खर्च करावे लागले. नुकत्याच जाहीर झालेल्या ई२० म्हणजेच पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या कार्यक्रमामुळे देशाचे प्रत्येक वर्षी ४ बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३०,००० कोटी रुपये वाचणार आहेत. पर्यायाने देशाची गंगाजळी, परकीय चलन वाचविणारा व इंधन निर्भरतेकडे नेणारा हा कार्यक्रम आहे.









































































