Last Updated on 25 Oct 2021 6:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल
सांगली :
टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी रात्री भारत – पाकिस्तान संघात झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानकडून भारताच्या झालेल्या लाजीरवाण्या पराभवामुळे नाराज झालेल्या क्रिकेट शौकिन तरुणांनी रस्त्यावर टीव्ही फोडून आपला राग व्यक्त केला.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून पराभव केला.भारतीय संघाचे चाहते यामुळे चांगलेच संतापले होते.
तुल्यबळ भारतीय संघासमोर तसा नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या पाकिस्तानचा टिकाव लागणार नाही असे भारतीय चाहत्यांना वाटत होते.पण भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तान संघासमोर सपशेल नांगी टाकल्याने भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.लाजिरवाण्या पराभवामुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
भारतीय संघावरील राग टीव्हीवर काढत इस्लामपुरातील तरुणांनी टीव्ही रस्त्त्यावर आणून दगड,काट्या घालून फोडून टाकला. व आपला संताप व्यक्त केला.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
भारत – पाकिस्तान सामन्यानंतर शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तरीही हा प्रकार घडल्याने शहरात याची चर्चा सुरु होती.












































































