Last Updated on 04 Dec 2025 5:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | इस्राईल येथे रिनोवेशन कन्स्ट्रक्शन (“Renovation Construction) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध असून, अधिक माहिती व नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रिनोवेशन कन्स्ट्रक्शन (Renovation Construction) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इस्राईल देशात प्लास्टरिंग वर्क (Plastering Work) (१००० जागा), सिरॅमिक टायलिंग (Ceramic Tiling) (१००० जागा), ड्रायवॉल वर्कर (Drywall Worker) (३०० जागा) व मेसॉन (Mason) (३०० जागा) या पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्याकरिता इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान (वाचन, लेखन व संवादकौशल्य), १० वी पास तसेच, वय वर्षे २५ ते ५० वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.












































































