Last Updated on 20 Sep 2021 5:01 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : बॅ.पी.जी.पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचे विचारदूत म्हणून वावरले. कर्मवीर अण्णा हे तिसऱ्या जगातील महत्त्वाचे शिक्षणतज्ञ म्हणून त्यांच्या विचारांची मांडणी पी.जी.नी नव्या पिढीपर्यंत पोहचवली असे प्रतिपादन प्रा.डॉ.संजय थोरात यांनी केले.
विटा येथील बळवंत कॉलेजमध्ये बॅ. पी.जी. पाटील व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे अध्यक्षस्थानी होते.
प्रा. थोरात म्हणाले, पी.जी. सरांचे गुरू व्ही.के. गोकाक त्यांना पी.जी. म्हणत. पुढे हेच नाव राज्यभर रूढ झाले. पी.जी. सर हे वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम होते. त्यांनी The Bountiful Banyan हे अण्णांचे इंग्रजी चरित्र चार खंडात लिहले. The Bountiful Banyan म्हणजे बहरलेला वटवृक्ष .या इंग्रजी आत्मचरित्रात्मक चरित्रामुळे शिक्षणाचे लोकशाही करण करणाऱ्या अण्णांची महत्वाचे शिक्षणतज्ञ म्हणून देशभर ओळख निर्माण झाली. पी.जी. सर प्रभावी लेखक व उत्तम जनसंवादी वक्ते होते.
अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले बॅ. पी.जी. पाटील यांच्या रूपाने एक शिक्षक समाज परिवर्तनात लोक शिक्षकाची भूमिका किती उत्तमरीत्या पार पाडू शकतो हे सिद्ध झाले. कर्मवीर अण्णा व बॅ. पी.जी. सरांसारख्या लोकशिक्षकांचा वारसा आम्हाला लाभला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
इंग्रजी विभागप्रमुख डॉ. दादासाहेब सनदी म्हणाले, पी.जी.पाटील व्याख्यानमालेच्या उपक्रमात सातत्य आहे.
डॉ. डी.एन.माने यांनी आभार मानले. प्रा.संध्या पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयातील इंग्रजी विभाग व स्टाफ वेलफेअर समितीने आयोजित केलेल्या या व्याख्यानाला प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला.














































































