Last Updated on 14 Oct 2025 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि काही भागांमध्ये अद्यापही काही प्रमाणात बालविवाहांच्या घटना आढळून येत असल्यामुळे या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीचे विशेष अभियान राबवण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले
११ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्या दिन) ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) या कालावधीत “बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस” हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा आज आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागीय पातळीवरही विशेष उपक्रम राबवण्याचे यावेळी त्यांनी निर्देश दिले.
मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंध आणि आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष उपाययोजना राबवाव्यात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, पेन, सुधागड, मुरुड, रोहा, पनवेल, खालापूर आणि माणगाव या तालुक्यांमध्ये सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात. तसेच, आदिशक्ती अभियान अंतर्गत कार्यरत ग्राम, तालुका, विभाग आणि राज्यस्तर समित्यांचाही या जनजागृती मोहिमेत सहभाग असावा अशा सूचना मंत्री आदिती तटकरे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी विभागाच्या आयुक्त श्रीमती नयना गुंडे, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, उपसचिव श्री. आनंद भोंडवे, अवर सचिव श्री. प्रसाद कुलकर्णी, सहआयुक्त श्री. राहुल मोरे, रायगडचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. श्रीकांत हावळे, श्रीमती सुजाता सकपाळ यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय उपायुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.














































































