Last Updated on 26 Feb 2024 9:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास (७२) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तीने निधनाची ही बातमी दिली आहे. उधास यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
चिट्ठी आई है आई है…चाँदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल…या लोकप्रिय गाण्यांमुळे पंकज उधास हे नाव घराघरात पोहचले होते.त्यांच्या निधनामुळे देश एका मोठ्या गायकाला मुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास यांच्यावर उपचार सुरू होते. पंकज उधास यांनी शेवटचा श्वास आज ११ वाजता मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात घेतला.
पंकज उधास यांना कॅन्सर झाला होता.त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्यामुळे ते कोणालाही भेटत नव्हते.त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आले आहे.पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले.
मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली
मुंबई | रसिकांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी…’ या सदाबहार गझलच्या माध्यमातून पंकजजींनी रसिकांच्या मनांचा ठाव घेत, गझल गायनाच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले.गझलांमधील तरल भावनांना सुरेल आवाज देणारा हा कलावंत तितकाच विनम्र होता. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय गझल गायकीला घरा-घरात आणि मना-मनात पोहचवणारा आवाज शांत झाला आहे. ते स्वररुपात अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकले आहे, असे शोकसंदेशात नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई | ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. हृदयात थेट पोहचणारी अशी त्यांची गायकी होती, त्यांच्या निधनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, पंकज उधास यांनी अनेक चित्रपटांसाठी विविध प्रकारची गाणी गायली. त्यांनी गायिलेल्या गजलांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर राज्य केले. आजही ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणं लागतं तेव्हा मन कातर होतं. त्यांची गाण्याची वेगळी शैली होती. मैफीलीत त्यांचे गाणे अधिक खुलून यायचे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.









































































