Last Updated on 14 Jun 2020 11:14 AM by
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चे जीवन संपवले.सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतसिंग राजपूत प्रसिद्धीच्या झोतात आला.महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने महेंद्र सिंग धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती.
नैराश्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण त्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमके कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आले होते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत.बॉलिवूडमधील एक चांगला हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने बॉलिवूड हादरुन गेले आहे.
सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात ‘किस देश में है मेरा दिल’ शोमधून केली. पण त्याला एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून लोकप्रियता मिळाली,त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.त्यानंतर सुशांतने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ‘काय पो छे’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.शेवटच्या वेळी तो ‘छिचोरे’ चित्रपटात दिसला होता. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका व दमदार भूमिका साकारल्या आहेत.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म बिहारच्या पाटणामध्ये 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता.त्याचे वडील सरकारी अधिकारी आहेत. त्याचे कुटुंब 2000 च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झाले होते. सुशांतसिंग राजपूत याने आपले सुरुवातीचे शिक्षण पाटण्यातील सेंट केर्न्स हायस्कूल व पुढचे शिक्षण दिल्लीच्या कुलाची हंसराज मॉडेल स्कूलमधून केले आहे.यानंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले.
छोट्या पडद्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास अगदी हेवा वाटेल असाच आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘ही अत्यंत दुःखद बातमी आहे. दिशाच्या कुटूंबियांशी आणि मित्रांबद्दल मला सहानुभूती आहे. तुमच्या आत्म्याला शांती मिळावी.दरम्यान,सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
३ जूनला सुशांत सिंह राजपूतने शेवटची इन्स्टा पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, ‘अश्रृंच्या वाफेतून निघणारे धुसर भूतकाळ, हस्याचा आकार असणारी, ना संपणारी स्वप्न आणि छोटेसे जीवन या दोघांमध्ये सौदा आहे.’













































































