Last Updated on 23 Nov 2021 9:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अलिबाग |
महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.
आज अंगारकी चतुर्थी आणि याच दिवशी दिवेआगारचे वैभव असलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा, म्हणूनच आजचा दिवस दिवेआगारवासियांसाठी सुवर्ण क्षण मानला जात आहे. येथील चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याच्या प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सपत्नीक सुवर्ण गणेशाची पूजा करण्याचा मान मिळाला.
कृषी पर्यटन धोरण, समुद्रकिनाऱ्यावरील बीच शॅक, निसर्ग पर्यटन धोरण, शामराव पेजे महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, जेट्टी विकास कार्यक्रम, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, मॉडेल आश्रमशाळा, वसई-विरार- अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर, अशा विविध विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासक भाष्य केले.
रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे सन 1997 साली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एका नारळ पोफळीच्या बागेत सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडली आणि जिल्ह्यातील दिवेआगार हे ठिकाण प्रसिद्धी झोतात आले. सुवर्ण गणेश पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी सुरू झाल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली. मात्र सन 2012 साली येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या सोन्याच्या मुखवट्याची चोरी झाली आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेले येथील वैभव लयास गेले. तब्बल 9 वर्षांचा काळ लोटल्यानंतर रायगड पोलीस, विविध शासकीय यंत्रणा आणि स्थानिक पत्रकार या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आज मंगळवार, दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने शासकीय अधिकाऱ्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या, स्थानिक पत्रकार आणि नागरिकांच्या साक्षीने सुवर्ण गणेशाच्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. यामुळे पुन्हा एकदा दिवेआगार पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. येथे चोरीसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी रायगड पोलीस दलामार्फत पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या नूतन पोलीस चौकीचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली असून यावेळी या योजनेचे देखील अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.














































































