Last Updated on 17 Jan 2022 1:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
प्रख्यात कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
काल मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाची माहिती दिली.
पंडित बिरजू महाराजांनी शास्त्रीय नृत्य लोकाभिमुख केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केले. अभिजात शास्त्रीय नृत्याचे ते आंतरराष्ट्रीय राजदूत होते. बिरजू महाराज प्रयोगशील होते व अनेकदा त्यांनी नवतेचा अंगिकार केला. संगीत व तबल्याची विशेष जाण असलेल्या पं. बिरजू महाराजांचा महाराष्ट्राशी घनिष्ठ स्नेह होता. अनेक शिष्योत्तम घडवून त्यांनी आपले ज्ञान मुक्तपणे वाटले व गुरुसेवा केली. पंडित बिरजू महाराज यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या शिष्यपरिवार तसेच कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.












































































