Last Updated on 22 Aug 2025 9:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सकाळी जाग आली, आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द — “पाणी वाढलंय…!” रात्री पात्रात असणारं पाणी पहाटेपर्यंत घरापर्यंत पोहोचलं. गावोगावी प्रापंचिक साहित्याची आवराआवर… सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ… असं दृश्य कृष्णा नदीकाठच्या वाड्यावस्त्यांमध्ये बुधवारी सकाळपासून होतं. कृष्णेची पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने नदीकाठच्या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गुरुवारची सकाळ कृष्णा नदीचे पुराचे पाणी ओसरू लागल्याच्या चर्चेने सुरु झाली. शुक्रवारी कृष्णेची पाण्याची पातळी ओसरल्याने नदीकाठच्या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रात्री उशिरापर्यंत कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्याने पाणी किती वाढेल, हा अंदाजच लागत नव्हता. “आणखी चार-पाच फुटं पाणी वाढेल” अशी चर्चा झपाट्याने पसरताच गावोगावी भीतीचे सावट गडद झालं होतं. पहाटे सहापासून प्रांताधिकारी व तहसीलदारांनी गावोगावी दौरे करून स्थितीची पाहणी केली. “सतर्क राहा, मात्र घाबरू नका; स्थलांतराची तयारी ठेवा” अशा सूचना प्रशासनाने दिल्या. नदीकाठचे ग्रामस्थ तणावाखाली होते.
या संपूर्ण तणावपूर्ण वातावरणाला गुरुवारची पहाट आशेची किरणं घेऊन आली. बुधवारी दुपारनंतर कृष्णा-कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे गुरुवार पहाटेपासूनच नदीपातळी हळूहळू खाली येऊ लागली. बहे पुलाजवळ बुधवारी रात्री पाणी २१.४ इंचांपर्यंत (इशारा पातळी) पोहोचलं होतं. मात्र रात्री उशिरा पाणी ओसरायला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळपर्यंत ८ इंचांनी घट झाली, तर रात्रीपर्यंत पर्यंत तब्बल ५ फुटांनी पाणी ओसरले. शुक्रवारी तर पुराचे पाणी पात्रात जाऊन स्थिरावले.
पुरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दिवसभर प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी गावोगावी भेटी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. याचबरोबर माजी मंत्री आ. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, भाजपा नेते राहुल महाडिक यांनीही पूरग्रस्तांना भेटून दिलासा दिला.









































































