Last Updated on 14 Apr 2023 7:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । पूर्वी काय झाले,काय होते हे जाणून घेण्याची वृत्ती आपल्यात हवी.मी इयत्ता ४ थीत असताना श्रीमान योगी,छावा आदी ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या आहेत.तर वयाच्या २३ व्या वर्षी युरोप देशांचा ३० दिवसांचा प्रवास केवळ २१ हजारात केला आहे.परत येताना युरोप देशांची काही नाणी आणली असून ती आजही जपून ठेवल्याचा किस्सा माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील दुर्मिळ नोटा व नाण्याच्या प्रदर्शन उदघाटन समारंभात शेअर केला. यावेळी त्यांनी प्रत्येक नागरिकाने दुर्मिळ नाणी,नोटा व स्टॅम्पसचे प्रदर्शन पाहून आपल्या मुलांना,घरातील महिलांना दाखवावे,असे आवाहनही केले.
इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात प्रबोधिनी आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित दुर्मिळ नाणी,नोटा व स्टॅम्पसच्या प्रदर्शनाचे आ. पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगीत ते बोलत होते. प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, अंनिसचे राज्य कार्यवाह संजय बनसोडे, प्रा.डॉ.एस.बी.माने,कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत,प्राचार्या दीपा देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आ.पाटील म्हणाले,पूर्वीच्या काळी नोटा,नाणी कशी होती? त्याकाळी आर्थिक व्यवहार कसे होत होते? हे जाणून घेणे आपल्या ज्ञानात भर घालणारे आहे. मला नेहमी उत्सुकता होती की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाणी,नोटा कशा असतील,त्यांचे व्यवहार कसे होत असतील? त्यावेळी आदिलशाही,कुतुबशाही,तसेच राजे-रजवाड्यांचे एकमेकांशी व्यवहार कसे होत असतील?. स्वतःचे नाणे सुरू करणे म्हणजे आपण प्रस्थापित झाल्याचे ते प्रतीक मानले जात असावे. .
अंनिसचे राज्य कार्यवाह संजय बनसोडे म्हणाले,आपल्या तालुक्यात इतके दुर्मिळ व नाविन्यपूर्ण नाणी,नोटा व स्टॅम्पसचे प्रदर्शन प्रथमच भरले आहे.१७५ देशातील नाणी ठेवण्यात आली आहेत.हे प्रदर्शन प्रत्येक व्यक्तीसह विद्यार्थी व युवक-युवतींनी पाहायला हवे.यावेळी नाणी,नोटा व स्टॅम्पस संग्राहक प्राचार्य एस.बी.माने,वसंतराव तुकाराम पाटील,सचिन माने,अजित सबनीस,बोरगावकर मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी प्रा.डॉ.एस.बी.माने यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात नाणी,नोटा,तसेच प्रदर्शनाबद्दल माहिती दिली.याप्रसंगी अँड. चिमन डांगे,पै.भगवान पाटील,दादासो पाटील,अँड.धैर्यशील पाटील,शंकरराव पाटील,डॉ.एन.टी.घट्टे,शिवाजीराव कुंभार,प्रा.डॉ.नितीन शिंदे,प्रा.बी.आर.जाधव,प्रा.सतिश चौगुले,प्रा.प्रदीप पाटील,अजय भालकरएम.डी.जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूरज उर्मिला यांनी आभार मानले.









































































