Last Updated on 12 Nov 2024 6:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भाजपची ‘बटेंगे तो कटेंगे ‘ ही घोषणा देशाला पुन्हा विभाजनाकडे नेणारी
सांगली । देशातील लोकशाही व संविधानापुढील धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच भाजपची ‘बटेंगे तो कटेंगे ‘ ही घोषणा देशाला पुन्हा विभाजनाकडे नेणारी आहे. त्यामुळे अशा जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत रहाणार आहोत. महाविकास आघाडी चे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ.जयंत पाटील यांच्या विजया साठी आम्ही प्रचार सभा घेणार आहोत,अशी माहिती वाळवा तालुक्यातील पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथील पत्रकार बैठकीत दिली.
श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) चे काँ.धनाजी गुरव म्हणाले, तालुक्यातील पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आम्ही मतदारांपर्यंत जाऊन आमची भुमिका मांडू. जातवार जनगनना महत्वाची असताना ती केली जात नाही. ओबीसींना आरक्षण द्यायला लागेल म्हणून भाजपने नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाच रद्द केल्या, हे भयानक आहे. २०११ साली झालेली जनगणना दाबून ठेवत आकडेवारी दिली नाही. केंद्राने ५० टक्के आरक्षणाची अट्ट कायम ठेवली. यातून ओबीसींच्या दोन पिढ्या बरबाद केल्या. त्यांचा ओबीसी व मराठा आरक्षणाला विरोध आहे. आघाडीचा जाहीर नामा सर्वांना सामाजिक न्याय देणारा,मराठा – ओबीसी आरक्षण सुरक्षित करणारा आणि चौफेर विकासाचा पाया घालणारा आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र राज्यातील सगळे मोठे उद्योग गुजरातलाच कसे गेले? – युवा नेते राजवर्धन पाटील
बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जी. पाटील म्हणाले, कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षण मागणाऱ्या आमच्या माणसांवर या सरकारने लाठ्या-काठ्या चालविल्या, हे मराठा समाज विसरलेला नाही. ज्यांच्यावर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याच लोकांना भाजपने सत्तेसाठी सोबत घेतले. अशा पक्षाला आम्ही मतदान का करावे?
मराठा सेवा संघाचे उमेश कुरळपकर म्हणाले, आम्ही इस्लामपूर मतदारसंघात स्वतंत्र १२ सभा घेणार आहोत.
दलित महासंघाचे शंकर महापुरे म्हणाले, यावेळी भाजपच्या आमिषाला मतदार बळी पडणार नाहीत.
संभाजी ब्रिगेडचे उमेश शेवाळे म्हणाले, जातीयवादी पक्ष पुन्हा सत्तेवर येवू नये, हा आमचा प्रयत्न आहे.
शेकाप चे प्रा.एल.डी.पाटील, अंनिसचे संजय बनसोडे, डीपीआयचे नंदकुमार नांगरे, आपचे गजानन पाटील,र विंद्र चौधरी, डॉ . भगवान पाटील, सागर रणदिवे, दिग्विजय पाटील, अजित हवलदार, समीर तांबोळी, सत्यजित जाधव, लहुजी वाघमारे,अहमद मुंडे, रणजित जाधव(मेजर), प्रा.सुभाष ढगे, अभिजित शिंदे, सुहास पाटील आदी ‘निर्भय बनो’चे कार्यकर्ते उपस्थित होते.











































































