Last Updated on 13 Nov 2021 4:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
कोरोनाने जगभरच दहशत निर्माण केली आहे. अनेकांना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. लसीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र असे असले तरी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या तर फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने दहशत निर्माण केली आहे. यामुळे भारतीयांनाही खबरदारी घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.
ब्रिटनमध्ये सध्या ९ हजार रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी १०२२ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. लसीकरण झाल्यामुळे कोरोना संसर्गाचा रुग्णांवर गंभीर परिणाम होत नाही. तर फ्रान्समध्ये सध्या १०७६ रुग्ण आयसीयूमध्ये, तर ६७०२ रुग्ण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान ब्रिटनने जून महिन्यात कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले होते. तेव्हापासूनच या ठिकाणी कोरोना संसर्गाची चौथी लाट सुरू झाली. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवून दररोज १५० ते २०० रुग्णांचा मृत्यू होत आहे.
नोव्हेंबर महिन्यात ३९ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. फ्रान्समध्येही ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाची पाचवी लाट सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात फ्रान्समध्ये ११ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळले, तर ३३ जणांचे मृत्यू झाले.













































































